मिलिंद नार्वेकरांऐवजी रवी म्हात्रे बनणार ठाकरेंचा नवा राईट हँड ?

0
172

राजकारणात कधी उलथापालथ होऊन होत्याचे नव्हते होते सांगता येत नाही. पक्षनिष्ठ असणारे नेते दुसया पक्षात जातात तर कधी दूर गेलेले लोकं पुन्हा जवळ येतात .. अशा पद्धतीच्या घटना गेले काही एक दिवस एका पक्षासंदर्भात सातत्याने दिसून येत आहेत. तो पक्ष म्हणजे शिवसेना !

सद्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजप बरोबर युती केली आणि भाजप + शिंदे गट सत्तेत आले. या बंडाच्या वेळी एक उल्लेख प्रामुख्याने होत होता तो म्हणजे , उद्धव ठाकरे यांच्या भोवतालची चौकडी .. तसेच , मिलिंद नार्वेकर आम्हाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत असाही आरोप अनेकजणांनी केला. याच पार्श्वभूमीवर ,उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असणारे मिलिंद नार्वेकर यांची जागा आता रवी म्हात्रे घेणार , अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

गेले काही दिवस रवी म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंभोवतीचा वावर वाढला आहे. गोरेगाव येथे झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांच्याभोवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे दिसून आले. त्यांचा शिवसेना भवनातील वावर अगोदरच वाढलेला आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रे यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता रवी म्हात्रे हे महत्त्वाचा दुवा ठरत आहे असे म्हटले जात आहे.

का होत आहे अशी चर्चा ?

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याच्या मंचावर उद्धव ठाकरेंच्या मागे रवी म्हात्रे हातात फाईल्स घेऊन असलेले दिसले. शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत.

कोण आहेत रवी म्हात्रे ?

रवी म्हात्रे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे, खास म्हणून ओळखले जातात. ते बाळासाहेबांचे सहाय्यक होते. २००४ पासून ते बाळासाहेबांचे सहाय्यक म्हणून काम पाहत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे ठाकरे कुटुंबियांसोबत होते.

बाळासाहेबांसोबत असताना रवी म्हात्रे यांच्याकडे शाखाप्रमुखांसह, आमदार, खासदार आपल्या समस्या घेऊन रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. त्यावेळी रवी म्हात्रे शिवसैनिकांमधील दुवा होते. याशिवाय, रवी म्हात्रे हेच बाळासाहेब ठाकरेंच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन करत असत.

पूर्वी मातोश्रीवर बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे रवी म्हात्रेंकडूनच यायचे.बाळासाहेबांच्या कार्यक्रमांचे नियोजनही करायचे. तेच बाळासाहेबांना रोज पेपर वाचून दाखवायचे, त्यातील महत्त्वाच्या बाबी काढायचे आणि संबंधित लोकांना बोलावून संवाद घडवायचे.

बाळासाहेबांच्या जवळ असणारे ‘राजे’ अचानक सोडून गेल्यानंतर , रवी म्हात्रे यांचं महत्व वाढल्याचे सांगितले जाते.

नार्वेकरांना काढण्याच्या मागचे कारण काय ?

शिंदे गटातील बंड पुकारलेल्या नेत्यांनि नार्वेकरांबद्दलची आपली नाराजी बोलून दाखवली होती. गणेशोत्सवादरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. ही भेट बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी होती असे सांगण्यात आले होते. मात्र या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले होते. शिंदे-नार्वेकर भेटीत राजकीय चर्चा झाली असेल हे तर नक्की होतं. यानंतरही पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे नार्वेकरांची आता खाजगी सचिव पदावरून उचलबांगडी केले जाईल अशी देखील चर्चा रंगली होती.

नव्या शिवसेनेची नांदी ?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर , शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. पक्ष कुणाचा, बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे, संजय राऊत यांना झालेली अटक, तेजस ठाकरेंची राजकारण एन्ट्री होण्याची चर्चा, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार, धनुष्यबाण राहणार की जाणार या सगळ्या गोंधळात ठाकरे गटाला आता नवी धोरणे आखणे गरजेचे आहे. यामुळे, रवी म्हात्रे यांचा वाढलेला वावर नव्या धोरणांची, बदलांची नांदी तर नव्हे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here