भाजप बारामतीत अमेठी, रायबरेली पॅटर्न राबवणार का ?

0
57

येत्या दोन वर्षांवर राहिलेल्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाकडून सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. यासाठी भाजपाने बारामतीत जोरदार तयारी देखील सुरु केली आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि विशेषतः पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांना एकजूट करत असल्याचे दिसून येते . यामुळे भाजपा बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.

भाजपने याआधी अमेठी आणि रायबरेली मिळवण्यासाठी असेच पर्यटन केल्याचे आपल्या समोर आहेच.

काय घडले रायबरेलीत ?

२०१९ साली रायबरेलीमध्ये भाजपाने संपूर्णपणे जोर लावला होता. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष यावरती भाजपा पक्षाने जोरदार टीका केली होती . हिंदू आतंकवाद मुद्दा देखील भाजपाने काढला होता. परंतु, सोनिया गांधीच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेथे जिंकून आल्याचे आपल्याला माहित आहे. तरी, २०१४ च्या तुलनेत त्यांच्या मिळालेल्या मतांमध्ये खूप वाढ झाली असे दिसून आले नाही . याउलट भाजपाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून आली.

काय घडले अमेठीत ?

२०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये भाजपा उमेदवार स्मृती इराणी आणि काँग्रेस उमेदवार राहुल ग्नादी यांच्यात जोरदार टक्कर झाली . २०१४ साली राहुल गांधी यात जिंकले होते. तर, २०१९ साली स्मृती इराणी यांचा विजय झाला.

लोकसभा निवडणूक २०१९ :

स्मृति जुबिन ईरानी (बीजेपी) : ४,६७,५९८ मतं
राहुल गांधी (कांग्रेस) : ४,१२,८६७ मतं

लोकसभा निवडणूक २०१४ :

राहुल गांधी (कांग्रेस) : ४,०१,६५१ मतं
स्मृति जुबिन ईरानी (बीजेपी) : ३,००,७४८ मतं

वरील माहिती लक्षात घेता स्मृती इराणी यांच्या मतात वाढ झालेली दिसून येते. तर राहुल गांधी यांच्या मतात घेत निर्माण झालेली लक्षात येते.

बारामतीच का ?

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.

बारामतीमध्ये भाजपा विशेष लक्ष देऊन आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच दोन दिवसांचा बारामती दौरा केला. त्यावेळी त्यांनी ‘2024 मध्ये बारामतीमध्ये घड्याळ थांबेल’ असं विधान करुन राष्ट्रवादीला इशारा दिला.

आम्ही अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकणार, अशा शब्दांत भाजप नेते राम शिंदे यांनी थेट पवार कुटुंबियांना आव्हान दिलं आहे.

याआधी सुद्धा बारामती मिळ्वण्यासाठी भाजपने प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यावेळेस बारामतीसाठी प्रयत्न करून गेले.
2014 मध्ये भाजपची लाट होती. त्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांवरच आलं पूर्वी ते 3-4 लाखांपर्यंत असायचं. त्यानंतर सुप्रियाने मेहनत घेतली आणि 2019 मध्ये ती मार्जिन दीड लाखापर्यंत वाढवली. भाजप जिंकण्याच्या जवळ गेला. पण हरवू नाही शकला. आता असा आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे की दीड लाखांपर्यंत मताधिक्य खाली आणलंच तर जिंकणंही शक्य आहे. त्यामागे कारण असं आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातले काही विधानसभा मतदारसंघ हे आधीच भाजपच्या ताब्यात आहेत.

ज्यामध्ये दौंड, खडकवासला (शहरी मतदारसंघ) भाजपकडे आहे. पुरंदरमध्ये तेव्हा शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा निसटत पराभव झाला होता. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपसोबत आहे. त्यामुळे 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपाची पकड आहे.

आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीचं लोकसभेत प्रतिनिधित्व करायचे यानंतर आता सुप्रिया सुळे करत आहेत. 2009 साली सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 ची निवडणूक मोदी लाटेत पार पडली आणि सुप्रिया सुळेंविरोधात रासपच्या महादेव जानकरांचं आव्हान होतं. ही लढत मात्र सहज झाली नाही. फक्त 69,719 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत 1 लाख 55 हजार मतांनी सुळे विजयी झाल्या.

त्यामुळे , यंदा भाजपा बारामतीसाठी कंबर कसून मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे, अमेठीत जे घडले ते बारामतीमध्ये घडणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here