जाणून घ्या पीएफआय संस्था नक्की काय आहे

0
60

राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच, एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकले. महाराष्ट्रात पुणे, मालेगाव, नवी मुंबई आणि भिवंडीसह अनेक ठिकाणी एनआयएने हे छापे टाकले. एएनआयनुसार, केरळमध्ये पीएफआयच्या नेत्यांच्या निवासस्थानी एनआयएचे अधिकारी पोहचले आहेत. तसंच पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या मलाप्पुरम याठिकाणच्या घरावर मध्यरात्री छापे टाकण्यात आले. तामिळनाडू, कोईमतूर, कडालोर, रामनाड, दिंडिगल, तेनी आणि तेनकासी या ठिकाणच्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांचीही एएनआयकडून चौकशी सुरू होती.

पीएफआय (PFI)ची सुरुवात कशी आणि का झाली ?

भारतात ८० च्या दशकात फार मोठी उलथापालथ झाली होती. याकाळात हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला होता. याची परिणीती १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात झाली. अयोध्येच्या या मुद्द्याने भारताच्या समाजकारणात आणि राजकारणात मोठे बदल घडवून आणले. मुस्लिम राजकारणही यापासून अलिप्त राहिलं नाही. याच काळात दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी यांची ‘आदम सेना’, तिकडे बिहारमध्ये ‘पसमांदा मुस्लिम महाज’ आणि मुंबईत ‘भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ’ या संघटना उदयास आल्या.

याच काळात मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. त्यामुळे दक्षिणेत केरळमध्ये ‘नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट’ (एनडीएफ) तामिळनाडूमध्ये ‘मनिथा नीथि पासराई’ आणि ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ या संघटनांची स्थापना झाली.

या संघटनांच्या स्थापनेनंतर त्यांच्यात आपापसात ताळमेळ होता. मात्र त्यांच्या स्थापनेच्या काही वर्षांनंतर म्हणजेच २२ नोव्हेंबर २००६ रोजी केरळमधील कोझिकोड इथं एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत या तिन्ही संघटनांचं विलिनीकरण करायचं ठरलं आणि यथावकाश १७ फेब्रुवारी २००७ रोजी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

पीएफआय (PFI) वर कोणते आरोप आहेत?

पीएफआय ही कट्टरतावादी संघटना आहे. २०१७ मध्ये एनआयएने गृह मंत्रालयाला पत्र लिहून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. एनआयएच्या तपासात ही संघटना हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले होते. एनआयएच्या डॉजियरनुसार ही संघटना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. ही संघटना अल्पसंख्यांक समाजावर धार्मिक कट्टरता लादण्याचे आणि त्यांना इतर धर्मियांचे धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचे काम करते.

हाथरस बलात्कार प्रकरण :

२०२१ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये हाथरस बलात्कार प्रकरण घडलं . हे प्रकरण घडल्यानंतर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने पाच हजार पानांची चार्जशीट दाखल केली. यात पत्रकार सिद्दीक कप्पन यांच्यासह पीएफआयच्या आठ सदस्यांची नाव आली आहेत. त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया अधिनियम (UAPA) आणि देशद्रोहाची कलम लावण्यात आली. तसंच यात विदेशी फंडिंग मिळाल्याचा दावा करण्यात आला. यावर सिद्दीक कप्पन म्हणाले की, मी तर एक पत्रकार म्हणून हे बलात्कार प्रकरण कव्हर करण्यासाठी जात होतो. माझा पीएफआयशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीये.

पीएफआय (PFI) आणि राजकारण संबंध :

PFI स्वतःला एक सामाजिक संस्था म्हणवते. या संघटनेने कधीही निवडणूक लढवली नाही. या संस्थेच्या सदस्यांच्या नोंदीही ठेवल्या जात नाहीत. यामुळे या संघटनेचे नाव कोणत्याही गुन्ह्यात आले तरी कायदेशीर यंत्रणांना या संघटनेवर कारवाई करणे अवघड जाते. २१ जून २००९ रोजी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नावाची राजकीय संघटना स्थापन करण्यात आली. ही संस्था पीएफआयशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. एसडीपीआयसाठी जमिनीवर काम करणारे कामगार पीएफआयशी संबंधित लोक असल्याचे सांगण्यात आले. १३ एप्रिल २०१० रोजी निवडणूक आयोगाने त्याला नोंदणीकृत पक्षाचा दर्जा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here