आर्थिक केंद्र मुंबईच्या ऐवजी गुजरात होत आहे का ?

0
68

मुंबई राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या केंद्रस्थानी असलेले एक शहर .. महाराष्ट्र राज्यात आणि देशात मुंबईला एक वेगळे महत्व आहे ती आपली आर्थिक राजधानी आहे. पण हीच आर्थिक राजधानी आता धोक्यात आली आहे का , मुंबई केंद्रस्थानवरून बाजूला होत चालली आहे का असे प्रश्न पडावेत अशा काही घडामोडी सध्या राज्यात घडत आहेत.

काल शिवसेनेच्या गट नेत्यांच्या मेळावा झाला . यात , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईबाबत अनेक महत्वाची विधाने केली . त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या आशयाचे एक ट्विट करत आरोप केले होते. त्यामुळे नक्की काय काय घडली आणि असे प्रश्न का उपस्थित होत आहेत जाणून घेऊया ..

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

सरकार असताना आम्ही निर्णय घेतले होते त्याला यांनी स्थगिती दिली. वरळीत आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्सालय झालंच पाहिजे. त्यासाठी मी संमती दिली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिथे इमारती केल्या तर काय करणार? धारावीत जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलं आहे ते झालं पाहिजे. लोकांना घरं बांधा. मुंबई संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या आर्थिक केंद्र शहरातून आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवता?

आज वेदांत गेला. त्याबद्दल ते धांदात खोटं बोलत आहेत. लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेवून तुम्ही बोलत आहात? एकत्र प्रोजेक्ट आणूयात.

एक-एक येणारे उद्योग हे निघून जात आहे आणि मिंदे गट नुसता शेळ्यासारखा होय महाराजा करत बसत आहेत. आज सुद्धा दिल्लीत गेलेत. दिल्लीज मुजरा आणि गल्लीत गोंधळ. ते मुजरा मारण्यासाठी दिल्लीत जातात. कितीवेळा झुकले असतील. पण महाराष्ट्राची बाजू दिल्लीत का सांगत नाहीत? सांगाना पंतप्रधानांना. वेदांताला केंद्राकडून भरघोस सवलती दिल्या जात आहेत. मग महाराष्ट्रात का सवलती दिल्या नाहीत.

मुंबईकर शिवसेनेवर का विश्वास टाकतात याचा कधी विचार केलाय? शिवसेना म्हटल्यावर आधार, विश्वास आणि विकास आहे. मुंबईत अनेक आपत्त्या आल्या प्रत्येक वेळी शिवसैनिक धावून जातो.

राष्ट्रवादी काँग्रेसने यादीच मांडली :

राष्ट्रवादी काँग्रेसने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचं कारस्थान हे हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे, अशी टीका केली आहे. महाराष्ट्रात सत्तापालट घडवून वेदांत – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवण्याचं कारस्थान हे हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे. बुलेट ट्रेनने हा रोख आधीच स्पष्ट केलाय. शेअर बाजारापासून ते औद्योगिक केंद्रापर्यंत सगळं गुजरातला नेऊन मुंबईची व्यापारी राजधानी ही ओळख पुसण्याचे हे कुटील उद्योग आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबई केंद्रशासित करून विदर्भही तोडला जाईल. मग भाजपावाले शिल्लक महाराष्ट्राचे आणखी लचके तोडायला मोकळे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

शिवाय गुजरातच्या नकाशामध्ये यापूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या विविध प्रकल्पांची यादी ट्विट केली आहे. यात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुंबई मुख्यालय, केंद्रीय यंत्रणांचे कार्यालय, एनएसजी, मरिन पोलिस अॅकडमी, हिरे मार्केट, बुलेट ट्रेन अशा विविध प्रकल्पांचा समावेश असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केले आहे.

याआधीही चर्चा :

मुंबई ला महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव सुरु आहे , मुंबईचे आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे अनेक आरोप .. यावरील अनेक चर्चा आजपर्यंत अनेकदा सामाजिक आणि राजकीय वर्तुळ झालेल्या आपल्या लक्षात येते पण काल उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्यामुळे आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्थिक केंद्र मुंबईच्या ऐवजी गुजरात होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here