जाणून घ्या इराणमध्ये हिजाबमुळे वातावरण नक्की का पेटले आणि हिजाब म्हणजे नक्की काय

0
70

फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकमध्ये हिजाबवरून वातावरण तापले होते. अवघ्या देशाचे लक्ष या प्रकरणामुळे खेचले गेले होते. असेच पुन्हा एकदा हिजाबवरून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे ते इराणवर .. इराणमध्ये असलेल्या कठोर हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलीस कस्टडीत असताना या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देशात महिला ठिकठिकाणी निदर्शनं करताना दिसत आहेत. त्या महिलेचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पण पोलिसांच्या अत्याचारामुळेच त्या महिलेचा मृत्यू झाला असावा असे लोक म्हणत आहे. तीन दिवस कोमात राहिल्यानंतर 22 वर्षीय महसा अमिनीचं रुग्णालयात निधन झालं. या घटनेचा निषेध करण्यासाठी इराणमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी हिजाब जाळून आपला निषेध नोंदवला आहे.

काय आरोप आहेत तिथल्या पोलिसांवर ? का अटक करण्यात आली त्या महिलेला ?

अमिनी यांना इराणच्या मोरालिटी पोलिसांनी अटक केली होती. महिलांनी आपले केस हिजाबने पूर्णपणे झाकावेत आणि हात, तसेच पायांवर सैल वस्त्रं असावेत असा नियम आहे.पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर अमिनी या कोसळल्या आणि नंतर त्या कोमात गेल्या.पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या दंडुक्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केल्यानंतर त्या कोसळल्या असं म्हटलं जात आहे. त्यांना पकडल्यानंतर त्यांचं डोकं वाहनांवर आदळल्याचे वृत्त आहे असं युनायेटेड नेशन्सचे मानवाधिकार उच्चायुक्त नदा अल नशीफ यांनी म्हटले आहे.

पण नक्की काय काय आणि कसं घडलं ?

इराणमध्ये मसहा अमिनीला पोलीस कोठडीत मरेपर्यंत मारहाण झाली. कोठडीत तिचा मृत्यू झाला. अमिनीच्या मृत्यूनंतर तेहरान शहरात पोलिसांविरोधात आक्रोश उफाळून आला. महिलांनी चक्क आपले केस कापून अमिनीला पाठिंबा दिला. एका इराणी पत्रकार महिलेने सोशल मीडियावर अमिनीला पाठिंबा जारी केला. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये तिने चक्क ‘हिजाब’ जाळून टाकला. दि. 16 सप्टेंबर रोजी महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभर या विषयावर निर्दशने सुरू आहेत. ‘हिजाब’सक्तीमुळे इराणमध्ये महिलांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इराणमध्ये पोलीस अमिनीला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओ ‘व्हायरल’ होऊ लागले. अमिनीचा गुन्हा काय तर तिने ‘हिजाब’ परिधान करण्यास विरोध केला. त्यावरून पोलिसांनी तिला कायदे-नियम धाब्यावर बसवून जबरदस्ती अटक केली.

तिच्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून मारहाणही केली. यामुळे देशात पोलिसांच्या या कृत्याविरोधात संतापाची लाट उसळली. नागरिक विशेषतः महिलावर्ग या प्रकाराचा सरकारला जाब विचारत आहे, निषेध नोंदवित आहेत. देशभरात बहुतेक ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनीही परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून आटोकाट प्रयत्न केले. मात्र, महिलांच्या जनशक्तीपुढे ते फोल ठरले. अखेर पोलिसांना बंदुकीच्या धाकावर तणाव निवळण्याचा प्रयत्न करावा लागला. यामुळे महिलांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. दि. 13 सप्टेंबरला अमिनीला अटक झाली होती. ‘हिजाब’ न वापरल्याने तिच्यावर कारवाई झाली.

स्थानिक वृत्तपत्रानुसार काय आले समोर ?

अमिनी यांना इराणच्या मोरालिटी पोलिसांनी अटक केली होती. अवघ्या काही वेळातच ती कोमामध्ये गेली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू झाले. अटक झाल्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत नेमके काय घडले, याची कल्पना कुणालाही नाही. डोक्यावर दुखापत झाल्याने अमिनीचा मृत्यू झाल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे. म्हणजे अटकेनंतर तीन दिवसांत तिचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलीस ठाण्यातच ती बेशुद्ध पडल्याचे ते सांगत आहेत. या प्रकरणात चौकशीचे आदेशही देण्यात आले.

एवढेच नाही तर 28 वर्षांच्या सेपदेह रोश्नो या अभिनेत्रीने ‘हिजाब’ न परिधान केल्याने तिला टीव्हीवर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले होते. पुढे तिलाही अटक झाली. अटकेनंतरही त्या अभिनेत्रीला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. ज्यावेळी तिने टीव्हीवर माफी मागितली, तेव्हा तिच्या डोळ्यांवरही मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. अमिनी प्रकरणाच्या महिनाभरापूर्वीच ही घटना घडली. रोश्नोला देशविरोधीही ठरविण्यात आले. एव्हाना इराणमध्ये ‘हिजाब’सक्तीचे बॅनर लावण्यात आले आहेत. तुम्ही तिथे सार्वजनिक ठिकाणी नृत्यही करू शकत नाही. कारण, तसे केल्यास तुमची अटक निश्चित. इस्लामिक देशातील महिलांच्या मूलभूत अधिकारांवर असलेल्या बंधनांविरोधात आता स्वतः महिलाच आवाज उठवत असल्याची ही सुरुवात तरी किमान चांगली आहे. भारतात मात्र या विषयांवरुन सोयीस्कर भूमिका घेणार्‍या कथित पुरोगाम्यांना तसे जमणार नाही.

हिजाब म्हणजे काय?

जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.

हिजाब आणि बुरखा सारखे असतात का ?

हिजाब आणि बुरखा यामध्ये फरक आहे. हिजाब म्हणजे चेहरा झाकणे तर बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. पर पुरुषाने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून मुस्लिम धर्मानुसार स्त्रियांनी बाहेर पडताना बुरखा परिधान करावा असं सांगितले जातं.

हिजाबचे वेगवेळे प्रकार कोणते ?

तसं तर ‘हिजाब’चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.

नकाब

नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.

बुरखा

मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.

अल-अमिरा

अल-अमिरा या वस्त्राचे दोन भाग असतात. एक म्हणजे कॉटन आणि पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि दुसरा म्हणजे एक झोळीसारखा स्कार्फ.

शायला

आखाती देशांमधला एक लोकप्रिय स्कार्फचा प्रकार म्हणजे शायला. हा लांबलचक स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळून, कमीज किंवा टॉपवर खांद्याजवळ त्याला पिन लावली जाते.

खीमार

खीमार एक लांब केपसारखा कपडा असतो, जो डोक्यावरून थेट कमरेपर्यंत असतो. त्याने डोकं, गळा आणि खांदे झाकले जातात, पण चेहऱ्यावर पदर नसतो.

चादोर

इराणमधल्या महिलांमध्ये चादोर खूप प्रसिद्ध आहे. घराबाहेर पडायचं असल्यास त्या हे वस्त्र घालतात, जे पूर्ण शरीर झाकतं. कधी कधी त्याच्यासोबत एक छोटा हेडस्कार्फ असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here